मुंबई: जागतिक बाजारपेठेतील मजबूत कल आणि त्याला अनुसरून धातू, वस्तू आणि वाहन क्षेत्रातील समभागांमध्ये झालेल्या खरेदीमुळे भांडवली बाजाराचा सप्ताहारंभ सकारात्मक राहिला. गुंतवणूकदारांच्या खरेदीला अनुकूल मूड पालटल्याने सोमवारी सेन्सेक्स ४१९ अंशांनी वधारून, ८१,००० च्या पातळीवर बंद झाला. अलीकडच्या दिवसांमधील भीतीदायी घसरणीनंतर गुंतवणूकदारांना हा मोठा दिलासाच आहे.
गत सप्ताहातील सलग दोन दिवसांची घसरण मोडून काढत, सेन्सेक्स ४१८.८१ अंशांनी (०.५२ टक्के) वाढून ८१,०१८.७२ पातळीवर दिवसअखेरीस स्थिरावला. बाजारात खरेदीचा जोरदार बहर होता, याचा प्रत्यय म्हणजे सेन्सेक्समधील ३० पैकी २६ समभाग वधारले आणि केवळ चार घसरणीत राहिले. दिवसभरात, सेन्सेक्स ४९३.२८ अंशांनी उसळला होता आणि दिवसअखेर त्यांनी उच्चांकी पातळीनजीकच विश्राम घेतल्याचे दिसून आले. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १५७.४० अंशांनी ०.६४ टक्के वधारून २४,७२२.७५ वर बंद झाला. या निर्देशांकानेही सत्रांतर्गत १६९.३ अंशांचा उच्चांक गाठणारी कमाई, सत्राच्या समाप्तीपर्यंत जवळपास टिकवून ठेवली.
