मुंबई: म्युच्युअल फंड हा आता सर्वतोमुखी झालेला गुंतवणूक प्रकार असून, लोकांनाही तो ‘सही’ असल्याचे गेल्या काही वर्षांत त्यातून मिळविलेल्या लाभामुळे मनोमन पटू लागले आहे. त्यामुळे या क्षेत्रात आता गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याची स्पर्धाही वाढली असून, उत्तरोत्तर नवनवीन म्युच्युअल फंड घराण्यांचा होत असलेला प्रवेश हेच सूचित करतो.
म्युच्युअल फंड उद्योगाचे प्रतिनिधित्व करणारे अधिकृत मंडळ ‘ॲम्फी’ने दिलेल्या माहितीनुसार, सध्या भारतात ४५ म्युच्युअल फंड घराणी कार्यरत आहेत. म्युच्युअल फंड घराणी, ज्यांना एएमसी अर्थात मालमत्ता व्यवस्थापन कंपन्या म्हणूनही ओळखले जाते, त्या गुंतवणूकदारांच्या वतीने त्यांचे पैसे विविध मालमत्तांमध्ये सूज्ञतेने गुंतवून त्यावर गुंतवणूकदारांना दीर्घकाळात इच्छित लाभ देत असतात. गेल्या काही महिन्यांत भारतातील एएमसी क्षेत्रात नऊ नवीन खेळाडूंचा झालेला प्रवेश या क्षेत्रातील वाढती स्पर्धा आणि वाढत्या व्यवसाय संधींचा प्रत्यत देतो.
याच मालिकेत वित्तीय सेवा क्षेत्रातील कंपनी असलेल्या चॉइस इंटरनॅशनलने तिची अंगिकृत उपकंपनी असलेल्या चॉइस ॲसेट मॅनेजमेंट कंपनीला (एएमसी) भांडवली बाजार नियामक ‘सेबी’कडून मालमत्ता व्यवस्थापन कंपनी म्हणून कामकाज सुरू करण्यासाठी अंतिम मंजुरी मिळाल्याचे शुक्रवारी घोषित केले. म्युच्युअल फंड व्यवसायात दाखल झालेले हे ४५ वे घराणे आहे.
या नियामक मंजुरीमुळे मुंबईत मुख्यालय असलेल्या चॉइस समूहाला त्यांच्या म्युच्युअल फंड योजना औपचारिकपणे सुरू करण्यास आणि वित्तीय सेवांचा परिघ विस्तारता येईल, असे कंपनीने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. चॉइस आता इंडेक्स फंड आणि एक्सचेंज ट्रेडेड फंड (ईटीएफ) सारख्या निष्क्रिय गुंतवणूक उत्पादनांपासून धोरणात्मक सुरुवात करेल आणि टप्प्याटप्प्याने अन्य वर्गवारीतील योजना प्रस्तुत केल्या जातील, असे कंपनीने म्हटले आहे.