पिंपरी : ‘मी आमदाराचा पुतण्या आहे’ असे सांगत एका वाहनचालकाने ‘नो एन्ट्री’ मध्ये जाण्याचा हट्ट धरून वाहतूक पोलिसांशी हुज्जत घातली. दमदाटी करून शिवीगाळ केल्याची घटना चाकण येथील माणिक चौकात घडली. या प्रकरणात पोलीस हवालदार लक्ष्मण आनाजी सांगडे यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मोटार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी माणिक चौकात वाहतुकीचे नियमन करत होते. त्यावेळी आरोपीने त्याच्या ताब्यातील मोटार ‘नो एन्ट्री’ असलेल्या ठिकाणी लावलेल्या बॅरिकेड्ससमोर उभी केली. ‘मी आमदाराचा पुतण्या आहे. मी येथूनच जाणार’ असे म्हणत त्याने नो एन्ट्रीतून जाण्याचा हट्ट धरला. त्याने मोठ्याने ओरडून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केले आणि फिर्यादीसह इतर पोलीस अधिकाऱ्यांशी हुज्जत घातली. तसेच, त्याने अपशब्द वापरून शिवीगाळ केली आणि शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला. चाकण पोलीस तपास करत आहेत.
भोसरीत दोघांवर कटरने वार
लोखंडी कटरने वार करत एकाने दोघांना गंभीर जखमी केले. ही घटना रविवारी (३ ऑगस्ट) रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास लांडेवाडी, भोसरी येथे घडली. या प्रकरणात ३८ वर्षीय व्यक्तीने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचा भाऊ हे एका सदनिकेमध्ये साफसफाईचे काम करत होते. त्यावेळी आरोपी तिथे आला. त्याने शिवीगाळ करत “माझे हात उसने घेतलेले पैसे कधी देतो” असे विचारले. त्यानंतर त्याने ‘तुला आता जिवंत सोडत नाही’ असे म्हणत फिर्यादीच्या गळ्यावर लोखंडी कटरने वार केले.
रहाटणीत दोन वर्षांच्या चिमुकलीचा मोटारीच्या धडकेत मृत्यू
घरासमोर खेळत असलेल्या दोन वर्षांच्या मुलीला मोटारीने धडक दिली. या अपघातात मुलीचा मृत्यू झाला. ही घटना शिवराजगनर रहाटणी येथे घडली. सुकन्या शिवराज देवरे (२) असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. याबाबत शिवराज जळबा देवरे (२४, रहाटणी, पुणे) यांनी काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार मोटार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवराज यांची मुलगी सुकन्या शनिवारी सायंकाळी घरासमोर खेळत होती. त्यावेळी आरोपीने त्याची मोटार निष्काळजीपणे आणि भरधाव वेगाने चालवून सुकन्याला धडक दिली. या अपघातात सुकन्या गंभीर जखमी झाली. त्यातच तिचा मृत्यू झाला. काळेवाडी पोलीस तपास करत आहेत.
म्हाळुंगेत पीएमपी बस चालक, वाहकाला मारहाण
दुचाकी स्लिप होऊन पडलेल्या दुचाकीवरील दोघांनी पीएमपी बसने धक्का दिल्याचा संशय घेत बस चालक आणि वाहकाला मारहाण केली. ही घटना बावधन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील म्हाळुंगे येथे घडली.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
या प्रकरणात वाहकाने फिर्याद दिली आहे. त्यानुसार दुचाकीवरील दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे पीएमपी मध्ये वाहक म्हणून काम करतात. त्यांचे सहकारी बस चालक यांच्यासोबत ते पीएमपी बस म्हाळुंगे येथून पुणे येथे जात होते. म्हाळुंगे येथील ग्रीन हिल सोसायटी समोर आरोपी त्यांच्या दुचाकीवरून स्लिप होऊन पडले. मात्र आपल्या दुचाकीला बसने धडक दिल्याचा त्यांचा समज झाला. त्यातून त्यांनी फिर्यादी वाहक आणि चालकाला शिवीगाळ करून मारहाण केली. बावधन पोलीस तपास करीत आहेत.